अकोला : राज्यभरात डेल्टा प्लसच्या निमित्ताने कोरोना पुन्हा डोके वर काढू पाहत आहे, मात्र विदर्भाची स्थिती तुलनेने चांगली दिसून येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात विदर्भातूनच झाली होती. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या हजारोवर पोहोचली होती. त्यात अकोला, यवतमाळ, अमरावतीसह नागपूर हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले हाेते. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे घसरलेला रिकव्हरी रेट पुन्हा वाढून ९० टक्क्यांवर गेला. जुलै महिन्याच्या अखेरीस अकोल्यासह विदर्भातील अकराही जिल्ह्यातील स्थिती चांगली होत गेली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंधही शिथिल करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मागील २२ दिवसांत विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. वऱ्हाडात अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याची वाटचाल कोविड मुक्तीच्या दिशेने होत आहे.
अशी आहे रिकव्हरी रेटची स्थिती
जिल्हा - रिकव्हरी रेट
अकोला - ९७.५
अमरावती - ९८.२
भंडारा - ९८.१
बुलडाणा - ९९
चंद्रपुर - ९८
गडचिरोली - ९७.६
गोंदिया - ९८.६
नागपूर - ९८.१
वर्धा - ९७.६
वाशिम - ९८.५
यवतमाळ - ९७.६
विदर्भात डेल्टा प्लसचा धोका कायम
मध्यंतरी विदर्भात अकोल्यासह नागपूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले होते, मात्र हे रुग्ण सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्ण नसून ठणठणीत असल्याची माहिती आहे. असे असले तरी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यांतर्गत सर्वच वाहतूक सुरू असल्याने विदर्भातही डेल्टा प्लसचा धोका नाकारता येत नाही.
विभागात कोविडच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. ही स्थिती चांगली असली, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. नागरिकांनी कोविड नियमावलीच्या त्रिसूत्रीचे पालन करावे. ज्यांनी लस घेतली नाही, अशांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ