अकोला : सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्याबाहेरील आलेले रुग्ण संचारबंदी अन् सीमाबंदीमुळे जिल्ह्यातच अडकले आहेत. दवाखान्यातून सुट्टी झाली, तरी त्यांना घरी परत जाता येईना. अशा परिस्थितीत काही दानशूर व्यक्तींकडून होत असलेल्या अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.पश्चिम विदर्भातील मेडिकल हब म्हणून अकोल्याची ओळख आहे. म्हणूनच जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशातच गरीब रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालय वर्दानच ठरत आहे. म्हणूनच दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात; पण कोरोनाच्या पृष्ठभूमिवर २६ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी अन् जिल्ह्यांतर्गत सीमा बंदी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयातच अडकले आहेत. रुग्णांना कसेबसे रुग्णालयात जागा मिळत असली, तरी त्यांच्या नातेवाइकांना फुटपाथवरच दिवस काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. सीमाबंदी असल्याने गावी परतही जाता येईना; पण अन्नदात्यांच्या मदतीने त्यांच्या पोटाची खडगी भागवण्यास मदत होत आहे. ना निवारा ना अन् आणखी किती दिवस उघड्यावरचे जीवन जगावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या शहरातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडकलेअमरावती, बडनेरा, अंजनगाव, नागपूर, हिंगोली यासह जवळपासच्या इतर जिल्ह्यांमधीलही रुग्ण व त्यांचे नातेवाइक सर्वोपचार रुग्णालयातच अडकले असल्याची माहिती आहे.
आस घरवापसीचीउपचारासाठी अकोल्यात आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक सीमाबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. स्वत:चं घर असूनही उघड्यावरचे जीवन जगावं लागत आहे. त्यामुळे ही संचारबंदी अन् सीमाबंदी कधी हटणार अन् आपण घरी कधी जाणार, अशी आस त्यांना लागली आहे.