अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी (६ सप्टेंबर) अकोला शहरात साजरा करण्यात येणाऱ्या पालखी कावड महोत्सवात यंदाही केवळ मानाची पालखी आणि २५ शिवभक्तांना परवानगी देण्यात येत असून, गांधीग्राम ते श्री राजराजेश्वर मंदिर पर्यंतच्या मिरवणूक मार्गावर ६ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी २७ ऑगस्ट रोजी दिला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यानुषंगाने अकोला शहरातील पालखी कावड यात्रा महोत्सवात केवळ मानाची एक पालखी व २५ शिवभक्तांना परवानगी देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केला. मानाच्या एका पालखीकरिता २५ शिवभक्तांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेवटच्या श्रावण सोमवारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिरपर्यंत मिरवणूक मार्गावर ६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वाहनांतून आणणार मानाची पालखी!
शेवटचा श्रावण सोमवार ६ सप्टेंबर रोजी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी मानाच्या पालखीला गांधीग्राम येथून राजेश्वर मंदिरापर्यंत पायदळ न आणता ठरावीक वाहनांमधून आणण्यासाठी २५ शिवभक्तांना परवानगी देण्यात आली आहे.
आदेशात असे देण्यात आले निर्देश अन् सूचना !
शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पालखी कावड मिरवणूक मार्गावर कलम १४४ लागू राहील.
कावड पालखीकरिता कोणत्याही प्रकारच्या ध्वनिक्षेपक साहित्याचा वापर अनुज्ञेय राहणार नाही.
प्रतिबंध करण्यात आलेल्या कालावधीमध्ये श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश राहणार नाही.
मंदिरातील विश्वस्त, पुजारी यांना मंदिरात पूजा अर्चा करण्याची मुभा राहील.
कावड पालखीकरिता ज्या भाविकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी काेराेनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.