अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे लागू असलेले ‘लॉकडाऊन’ वाढण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट वाढल्याच्या परिस्थितीत सध्या लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलनंतरही ‘लॉकडाऊन’ लागू ठेवल्यास जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यानुषंगाने करावयाच्या विविध उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध यंत्रणांकडून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार ‘लॉकडाऊन’ मुदत वाढीच्या कालावधीत करावयाच्या विविध उपाययोजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत.कोरोना बाधित ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यातील 'लॉकडाऊन'च्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.