अकोला : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्युदरही चिंताजनक आहे. सद्य:स्थितीत राज्याचा मृत्युदर २.६ टक्क्यांवर स्थिर आहे. हा दर १ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे, मात्र राज्यातील ११ जिल्ह्यांचा मृत्युदर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विदर्भात सर्वाधिक ३.५ टक्के मृत्युदर अकोला जिल्ह्याचा असून, ही बाब चिंताजनक आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोविडचा फैलाव आणि मृत्यूचे प्रमाण यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले होते; मात्र दिवाळीनंतर रुग्णसंख्यावाढीचा आलेख पुन्हा उंचावत गेला. सोबतच मृत्यूचा आकडाही वाढत गेला. दरम्यान, आरोग्य विभागानेत राज्यातील मृत्युदर हा १ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, काही प्रमाणात आरोग्य विभागाला यशदेखील आले आहे. सद्य:स्थितीत राज्याचा कोविड मृत्युदर २.६ टक्क्यांवर स्थिर आहे, मात्र राज्यातील ११ जिल्ह्यातील मृत्युदर हा अजूनही ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे प्रमाण जास्त असून, यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. विदर्भात अकोला जिल्हा वगळल्यास उर्वरित जिल्ह्यांचा मृत्युदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
या जिल्ह्यांचा मृत्युदर सर्वाधिक
जिल्हा - मृत्युदर
मुंबई - ३.८
परभणी - ३.७
सांगली - ३.५
अकोला - ३.५
कोल्हापूर - ३.४
सोलापूर - ३.३
सातारा - ३.२
नांदेड - ३.१
बीड - ३.१
नाशिक, पुण्यात मृत्युदर नियंत्रणात
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यातील मृत्युदर नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर १.६ टक्क्यांवर, तर पालघर १.९, पुणे २.१ टक्क्यांवर आहे. विदर्भात नागपूर जिल्ह्याचा मृत्युदर २.६ टक्क्यांवर आहे.
मृत्युदर नियंत्रणास ही आहे अडचण
बहुतांश रुग्ण उशिरा घेताहेत उपचार.
अनेक जण अंगावर काढतात दुखणे.
कोविड चाचणीस टाळाटाळ.
लक्षणांकडे दुर्लक्ष.
कोरोनाचा मृत्युदर नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे. परंतु, आरोग्य विभागाला नागरिकांची साथ आवश्यक आहे. लक्षणे दिसताच कोविडची चाचणी करून उपचार सुरू करावा. अनेक गंभीर रुग्णांनी सुरुवातीला उपचार टाळल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर आहे. कोरोनाच्या बाबतीत बेफिकिरी करून चालणार नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला