कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. वाडी अदमपूर येथे १४ व जाफ्रापूर गावातील ९ रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. गावातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने विविध उपाययोजना राबवून संक्रमण रोखले. गत आठवड्यापासून या दोन्ही गावात नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे गावात समाधान व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण केले. गावात जास्तीत टेस्टिंग कॅम्प व लसीकरण कॅम्प घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांचे जवळपास ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. सरपंच रुपेश राठी यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोरोना प्रतिबंधक तसेच लसीकरणाबाबत जनजागृती करून गावातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध केला आणि नियमित मास्कचा वापर बंधनकारक करीत, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच गाव कोरोना मुक्त करण्यासाठी तेल्हारा पोलीस ठाणेदार, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
फोटो:
यांचे प्रयत्न आले फळास
गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सरपंच रुपेश राठी, ग्राम सचिव वर्षा फाळके, डॉ. उज्ज्वल व्यवहारे, आरोग्य सेविका जी. एस. राहाटे, आशा वर्कर रंजना भोजने, सीमा भोजने, दीपाली सरदार, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला राऊत, उपसरपंच मीना शेळके, ग्रामपंचायत सदस्य लीला कोतकर, सुरेंद्र भोंगळ, विठ्ठल खारोडे, जितेंद्र जाधव, साधना बोदडे, रंजित बोदडे, कर्मचारी हरिसिंग पवार, दीपक भाकरे आदी गावात सातत्याने जनजागृती केली आणि नागरिकांना नियम पाळण्यास बाध्य केले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने विविध निर्णय व उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना मुक्तीसाठी गावकऱ्यांनी एकजुटीने सहकार्य केले. नागरिकांच्या मनातून लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून ७० टक्के लसीकरण करून घेतले.
-रुपेश राठी,
सरपंच गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर
गावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गावात एकही कोरोना रूग्ण नाही. परंतु नागरिकांनी बेफिकीर न राहता खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-वर्षा फाळके,
ग्रामपंचायत सचिव, वाडी अदमपूर