लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. त्यानुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासंदर्भात प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.आधार कार्ड नवीन नोंदणी व आधार कार्डातील क्रमांक, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहितीच्या दुरुस्तीसाठी आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, तसेच आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी बायोमेट्रिक मशीनवर नागरिकांच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात.त्यानुषंगाने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ मार्च रोजी दिला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून आणि नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याकरिता जिल्ह्यातील आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.