अकोला : कोरोनाचा धसका बसल्याने रक्तपेढ्यांनाही फटका बसला आहे. शहरातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठाच उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. तेव्हा रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या. तुमच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचणार आहेत.कोरोनामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनाही घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्याचा फटका रक्त संकलनाला बसला असून, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. प्रशासनातर्फे पाच रक्तदान शिबिरे घेण्यात आली असून, त्यामध्ये ८१ लोकांनी रक्तदान केले आहे. या माध्यमातून १३२ युनिट रक्तसाठा संकलित करण्यात आला आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आपल्या रक्तदानातून अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.रक्तदात्यांनो हे करा...
- रक्तदात्यांनो रक्तदानासाठी तुम्ही रक्तपेढ्यांशी संपर्क साधू शकता.
- बाहेर पडणे शक्य नसेल, तरी किमान दहा रक्तदात्यांची यादी रक्तपेढ्यांना द्या.
- त्यासाठी प्रशासनही परवानगी देईल.
- रक्तपेढ्या स्वत:च पुढाकार घेऊन तुमचे रक्त संकलित करेल.
हे रक्तदान करू शकणार नाहीत!
- गत २८ दिवसांमध्ये परदेशात प्रवास.
- परदेशातून प्रवास केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास.
- रक्तदात्यास किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस गत २८ दिवसांत सर्दी, ताप, खोकला असल्यास.
कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. रक्तपेढ्यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या व अन्न व औषधी विभागाच्या सूचनांचे पालन करूनच रक्त संकलन करावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.