- सदानंद सिरसाटअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी मुबलक बियाणे मिळणे कठीण होणार आहे. खासगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडून शासकीय यंत्रणेला प्रतिसाद मिळत नसल्याने ही परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.दरवर्षी खरिपाच्या पेरणीसाठी बियाण्यांचे नियोजन मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून सार्वजनिक क्षेत्र तसेच खासगी कंपन्याकडे मागणीही नोंदवली जाते. चालू वर्षात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे खासगी कंपन्यांची कार्यालये जवळपास बंद आहेत. तर सार्वजनिक क्षेत्रात शासनाचा सहभाग असल्याने त्यांच्याकडून केलेल्या मागणीएवढे बियाणे उपलब्ध होऊ शकते; मात्र दोन्ही मिळून आवश्यकतेएवढे बियाणे उपलब्ध होणे कठीण असल्याचे सद्यस्थितीत जाणवत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून संबंधित खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांशी संपर्क केला जात आहे; मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने बियाण्यांचे नियोजनही पूर्णत्वास नेणे कठीण झाले आहे.अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी सर्व प्रकारचे किमान ७७ ते ८२ हजार क्विंटल बियाणे लागते. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातून ४५ तर खासगी क्षेत्रातून ४० हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला जातो. याबाबतचे नियोजन करून तशी मागणी दोन्ही क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांकडे केली जाते. चालू वर्षातील खरीप हंगामासाठीही कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे; मात्र खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. चालू वर्षात जिल्ह्यात संपूर्ण क्षेत्रावर पेरणी गृहीत धरून नियोजन केले जात आहे. त्यासाठी ८६ हजार ५० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी ४,०११७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून मिळणे अपेक्षित आहे. तर महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून ४,५९०३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यातही महाबीजकडूनच ४,०९०३ क्विंटल बियाणे मिळण्याची शक्यता आहे.- सोयाबीनची वाढीव क्षेत्रासाठी मागणीदरवर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र काही प्रमाणात घटत आहे. त्याचवेळी चालू वर्षात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे गृहीत धरून बियाण्यांची मागणी केली जात आहे. सोयाबीन बियाण्यांच्या वाढीव मागणीनुसार ३७,७०० क्विंटल बियाणे सार्वजनिक क्षेत्रातून मिळणार आहे. तर उर्वरित २८ हजार क्विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून मिळवावे लागणार आहे; मात्र ते मिळणार की नाही, या विवंचनेत आता कृषी विभाग आहे.- बीटी कापसाच्या ७.४२ लाख पाकिटांची मागणीबीटी कापूस पेरणीसाठी जिल्ह्यात ७ लाख ४२ हजार ५०० पाकिटांची मागणी केली जाणार आहे. त्यापैकी खासगी कंपन्यांकडून किती प्राप्त होतात, यावरच कृषी विभागाच्या नियोजनाचे भवितव्य अवलंबून आहे.