अकोला : कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून, अटींचे बंधन घालून केशकर्तनालयांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा लागत असल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगचे दर किंचित वाढविले आहेत. कोरोना आधीच्या काळात ३० व ८० रुपये असलेेले दाढी व कटिंगचे दर आता अनुक्रमे ४० व ८०-१०० रुपयांवर आले आहेत. अकोला शहरात जवळपास ७३२ दुकाने असून, सध्याच्या घडीला यापैकी बहुतांश दुकाने खुली झाली आहेत. कोरोना आधीच्या काळात सलूनची दुकाने ज्या प्रमाणे गजबजलेली असायची, तशी स्थिती मात्र आता नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी केशकर्तनालयांकडे ग्राहकांची पावले वळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सलून व्यावसायिकांचा धंदा पूर्वपदावर आलेला नाही. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणू प्रत्येक ग्राहकास वेगळा ॲप्रन, सॅनिटायझर, टिश्यू पेपर आदी साहित्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांनी दाढी व कटिंग व इतर सेवांचे दर वाढविले आहेत. साध्या दुकानात दाढीसाठी ३० रुपये, कटिंगसाठी ८० रुपये, लहान मुलांच्या कटिंगसाठी ८० रुपये, हेअर डायसाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. वातानुकूलित दुकानांमध्ये दाढीसाठी ५० रुपये, कटिंगसाठी १०० रुपये, लहान मुलांच्या कटिंगसाठी १०० रुपये, हेअर डायसाठी १५० ते २०० रुपये दर आकारल्या जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी घेतली जाते काळजी
- संपूर्ण दुकान व साहित्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.
- प्रत्येक ग्राहकास स्वतंत्र ॲप्रन
- दाढीच्या साबणाऐवजी आता फोमचा वापर
- दुकानात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यावर भर
- मास्कचा वापर
महिनाकाठी दोन हजारांचा अतिरिक्त खर्च
कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचा अवलंब करावा लागत असल्याने सलून व्यावसायिकांचा खर्च वाढला आहे. सॅनिटायझर, ग्राहकांसाठी स्वतंत्र ॲप्रन, टिश्यू पेपर, यूझ ॲन्ड थ्रो साहित्य वापरावे लागत असल्याने महिनाकाठी अंदाजे २ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याचे एका सलुलू व्यावसायिकाने सांगितले.
कोरोना संकटात व्यवसाय बंद होता. त्यामुळे दुकानांचे भाडे थकले असून, या कारणामुळे १२ ते १५ दुकाने बंद आहेत. शासनाने मदतीचा हात द्यावा.
- गजानन वाघमारे, अध्यक्ष, नाभिक दुकानदार युवक सेना, अकोला.