अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा सर्वाधिक फटका हात मजुरी करणाऱ्या मजुरांना बसला आहे. रोजगार तर गेलाच; पण दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नाही, अशीच काहीशी परिस्थित छत्तीसगढ येथून आलेल्या त्या ४० कुटुंबाची झाली आहे.गत तीन ते चार वर्षांपासून छत्तीसगढमधील एका लहानशा गावातील जवळपास ४० कुटुंब रोजगाराच्या शोधात अकोल्यात वास्तव्यास आहेत. अंगी असलेल्या कला कौशल्याच्या जोरावर पोटाची खडगी भरत आहेत. कच्च्या मालापासून झाडू निर्मीती करणे आणि गल्लोगल्ली तसेच गावोगावी ते विक्रीचे काम हे लोक करत आहेत. दिवसभराच्या मेहनतीतून मिळालेल्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाला कोरोनाच्या संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. रोजगार गेल्याने पैसाही नाही, तर संचारबंदीमुळे आहे तेवढ्या पैशातून किराणाही आणणे शक्य नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नाही.पोलीस दादाने केली मदत संकटाच्या या काळात बोहर पडण्यास मनाई करणाºया पोलीस दादाकडूनच जेवणाची सोय होत आहे. एक दोन दिवसा आड एक पोलीस कर्मचारी येथील सर्व कुटुंबासाठी गव्हाचे पीठ, दाळ, बिस्कीट आदि खाद्य पदार्थ देऊन जात आहेत. ही मदत आहेत असली, तरी रोजगार तर गेलाच. प्रामुख्याने आम्ही भात खाणारे, पण अशा परिस्थितीत जे मिळाले तेच खुप असल्याचे येथील एका मजुराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गावी ही जाता येईना!रोजगार नसल्याने दोन वेळच्या जेवणाचीही सोय होत नाही. त्यामुळे गावी जाण्याचा प्रयत्न केला. पण, संचारबंदीमुळे रेल्वेही बंद असून, जिल्ह्याबाहेर जाणे कठीण झाले आहे. दरवर्षी राम नवमीला गावात मोठा उत्सव असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे गावीही जाता येत नसल्याचे येथील मजुरांनी सांगितले.‘कोरोना’विषयी जनजागृतीची गरजया मजुरांसोबत चर्चा करताना त्यांना कोरोना विषयी विचारले असता, हा केवळ एक आजार असल्याची त्यांना माहिती आहे. पण, त्याची लक्षणे काय,आजारी पडल्यावर काय करायला पाहिजेत, या विषयी त्यांना माहिती नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झाल्यास येथे वास्तव्यास असलेल्या सर्वच कुटुंबांना त्याचा धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागातर्फे येथे कोरोना विषयी जनजागृतीची गरज आहे.