विझोरा : येथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात गत बारा दिवसांत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने गावात उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावाला कोरोनाला रोखण्यात बऱ्यापैकी यश आले होते. गावात तीन ते चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते; मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. गत बारा दिवसांमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गावात आतापर्यंत दोन वेळा स्वॅब तपासणी कॅम्प घेण्यात आला. या शिबिराला नागरिकांनी पाठ दाखविली होती. ज्या संदिग्ध रुग्णांची तपासणी केली होती, त्यापैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. दुसऱ्या तपासणी शिबिरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तर वाढली, त्याचबरोबर दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये दि.२६ एप्रिल रोजी ५० वर्षीय व्यक्ती, तर दि.७ मे रोजी ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे असतील त्यांनी त्वरित कोरोनाची तपासणी करावी, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.