अकोला: सध्या कोरोनाची साथ ओसरू लागली आहे, तर दुसरीकडे पावसाळ्याला सुरुवात झाल्याने डेंग्यू, मलेरियाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी वेळीच आवश्यक ती खबरदारी घेऊन डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लावण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यता आले आहे.
कोरोनाच्या संकटातून अकोलेकरांची आता काही प्रमाणात सुटका होऊ लागली आहे. अशातच डेंग्यू, मलेरियाचे दुसरे संकट समोर येऊन ठेपले आहे. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू होण्यापूर्वीच ती रोखण्याचे अकोलेकरांसमोर मोठे आव्हान आहे. मागील पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्हा मलेरिया मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या नेहमीच कायम आहे. प्रशासनाने आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत, अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरियाची साथ अकोलेकरांना परवडणारी नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देऊन वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घरातील पाण्याची भांडी नियमित धुणे, कुठेही पाणी साचू न देणे ही काळजी प्रामुख्याने घेण्याची गरज आहे.
ही घ्या काळजी आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे.
अशी आहे आकडेवारी
हिवताप - डेंग्यू
वर्ष - रक्त नमुने- रुग्ण - रक्त नमुने - रुग्ण
२०१७ - ३२४६८४ - ५३ - ४८४ - १८
२०१८ - ३३६५३८ - ३६ - ४१५ - ७०
२०१९ - ३४४६६० - ११ - ३१४ - ६१
२०२० - २७०४३८ - ०९ - ३२९ - ३१
२०२१ - ५७९२२ - ०१ - -- --
येत्या काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. तसेच मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला
डबक्यांमध्ये गप्पी मासे
ग्रामीण व शहरी भागामध्ये साचलेले पाणी, डबके येथे डास भक्षक गप्पी मासे सोडण्यात येतात. ज्या भागामध्ये वाढ झालेली आहे. तेथे कीटकनाशक फवारणी घरोघरी करण्यात येते.
जिल्ह्यामध्ये एकूण १९७ गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित असून त्यामधील गप्पी मासे आवश्यकतेनुसार डासोत्पत्ती स्थानांमध्ये सोडण्याची कार्यवाही निरंतर राबविण्यात येते. तसेच धूर फवारणीचे कार्य मागणीनुसार करण्यात येते.