अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जागतिक महामारीचे स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊनसारखा मार्ग निवडला गेला. गेल्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना हिंमत देण्याऐवजी प्रत्येक दिवशी नागरिकांसमोर भीतीचे वातावरण तयार करून इतर मुद्यांवरील अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्यापूर्वीच धोक्यात आली होती. आता कारोनाचे निमित्त पुढे करून सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.अॅड. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या नावावर या सरकारने स्थलांतरित मजुरांचे हाल केले. तब्बल १५ कोटी मजूर उपाशीपोटी पायीपायी आपल्या घराकडे परतले. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षाही या मजुरांची वेदना मोठी आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कोरोनाच्याच भोवती शासन व प्रशासन फिरवित ठेवत इतर आघाड्यांवर सरकारला आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. कोरोनाची रुग्णसंख्या कमी असताना लॉकडाऊन कडक व आता रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनलॉकची प्रक्रिया वेगात असा विरोधाभासी निर्णय घेणारे सरकार कोरोनाची खरी आकडेवारीही लपवित असून, नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासन निर्णय घेत नाही. राज्य शासनाला निर्णयाचे अधिकार देते. राज्य शासन स्थानिक प्रशासनाला अधिकार देते व प्रशासनात समन्वय नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 6:39 PM