- राजेश शेगोाकार
अकोला : एका रेस्टॉरंटमध्ये एका सुप्रसिद्ध शेफने अतिशय चवदार पुलाव बनवला. त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास १०० लोकांना रेस्टॉरंटमधील वेटरने पुलाव वाढला. प्रत्येकाने पहिला घास हातात घेतला आणि तोंडात घालणार, त्या क्षणी शेफने येऊन सांगितले यात गारेचा एक खडा पडलाय आणि तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कुणाला येईल हे सांगता येणार नाही. कुणाच्या घासात आला तर इजा होऊ शकते म्हणून काळजी घ्या. शेफच्या या इशाऱ्यामुळे पुलावचा स्वाद ,चव उत्तम असतानाही खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येक घासागणिक चवीकडे लक्ष न जाता घास सावकाश खाल्ला जातोय ना? न जाणो खडा आपल्यालाच आला तर...या भीतीने प्रत्येक जण जेवण करू लागला...असे काहीसे आता तुमच्या-आमच्या आयुष्याचे झाले आहे. सर्वच चांगले आहे; पण कोरोनारूपी खडा आपल्याच पात्रात तर येणार नाही ना, याची धास्ती प्रत्येकाला आहे. व्हॉट्स अॅपवर सध्या फिरत असलेला हा मॅसेज खूपच अर्थपूर्ण आहे. येणारा काळ आता कोरोनासोबतच राहावयाचा असल्याने प्रत्येकाला काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.अकोल्याच्या पृष्ठभूमीवर जेव्हा या काळजीचे चित्र आपण पाहतो तेव्हा कोरोनाची खरेच धास्ती आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग हे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अकोलेकर बिनधास्तपणे रस्त्यांवर गर्दी करताना दिसतात. कोविड सेंटर असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाचा सावळा गोंधळ संपता संपत नाही. येथे इतर रुग्णांचे नातेवाईक त्यांची गर्दी कायमच आहे.कोरोनाच्या चाचणीसाठी आलेल्या रुग्णांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. एवढे कमी की काय, तुम्हाला बाहेरगावी जायचे असेल तर तुमची तपासणीही न करता तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्रही देण्यात येते. ‘लोकमत’ने चार दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आणल्यावर आता किमान प्राथमिक तपासणीची अंमलबजावणी सुरू झाली. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढती असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कोरोनाच्या लढाईला अडसर ठरत आहे. याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचे दुर्दैवाने लक्ष नाही.गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाने मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग न पाळण्याºयांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे; मात्र त्याचे प्रमाण कमीच आहे. वैयक्तिक सुरक्षेमधून कोरोनाला रोखता येऊ शकते, हे लोकांपर्यंत पोहोचले आहे; पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये आता हळूहळू बेफिकिरी येऊ लागली आहे. लॉकडाऊन एकच्या कालावधीत कोरोनाची असलेली धास्ती आता लोकांमध्ये दिसत नाही; मात्र त्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूची आताच्या परिस्थितीशी तुलना केली तर आता संकट अधिक तीव्र झाले असल्याचे दिसते. त्यामुळे लोकांनीही अधिक सजग राहणे आवश्यक आहे. दुसरीकडे अकोला शहरातून आता कोरोना ग्रामीण भागाकडे सरकला आहे. कोरोनाच्या शिरकावापासून दूर राहिलेला तेल्हाराही कोरोनाच्या कचाट्यात आला आहे. एकीकडे पावसामुळे दरवर्षी येणारे आजार अन् त्याच्या जोडीला कोरोनाचे संकट यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे. अकोट शहरात सात दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. अनेक लहान-मोठ्या गावांमध्येही ग्रामस्थ एकत्र येऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय राबवित आहेत. ही बाब चांगलीच आहे; मात्र आता सामूहिक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचे गांभीर्य येणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाले आहे. खरे तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही; मात्र जर प्रत्येक जण बेफिकीर झाला तर हाच एक पर्याय शिल्लक राहतो. सध्या अकोल्याचे अर्थचक्र हळूहळू फिरत आहे. ते गतिमान होण्यास वेळ लागेल. अशा परिस्थितीत आणखी एक लॉकडाऊन कोणालाच परवडणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने जबाबदार होणे हाच एकमेव मार्ग सध्या तरी दिसत आहे.