अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सर्वाधिक फटका हा पर्यटन उद्योगाला बसला आहे. अनलॉकनंतर आता जिल्हाबंदी संपुष्टात आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनासाठी निघणाऱ्यांची संख्या मर्यादितच असून, हे पर्यटक स्थानिक स्थळांनाच भेटी देण्यास पसंती दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.२४ मार्चच्या लॉकडाऊननंतर सर्व अर्थकारणच ठप्प झाले. एप्रिल व मे हे दोन महिने पर्यटनाचे महिने असतात; मात्र या दोन महिन्यातच कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक होता, तसेच लॉकडाऊन होते त्यामुळे अनेक पर्यटकांना आपल्या नियोजित सहली रद्द कराव्या लागल्यात. उन्हाळ्यानंतर पावसाळी पर्यटनासाठीही अनेक पर्यटक उत्सुक असतात; मात्र कोरोनामुळे हे पर्यटनही बुडाले. आता १ सप्टेंबरपासून अनलॉकची प्रक्रिया व्यापक झाली. एसटी सुरू झाली, मर्यादित प्रमाणात रेल्वे व विमानसेवाही सुरू आहे. जिल्हाबंदीही संपुष्टात आली; मात्र कोरोनाचा प्रसार वाढताच असल्याने पर्यटक धास्तावलेलेच आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून घर व आपल्याच शहरात बंदिस्त झालेल्या पर्यटकांनी आता स्थानिक पर्यटनस्थळांना पसंती दर्शविली आहे. यावर्षी पाऊसही भरपूर झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या स्थळी भेट देऊन जंगल भ्रमंती करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. महान धरण, वान प्रकल्प, माळराजुरा, मोर्णा अशा प्रकल्पांसह काटेपूर्णा जंगल भ्रमंतीसाठी पर्यटकांची पसंत मिळत असल्याचे चित्र आहे.