कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे, मात्र अनेक जण बेफिकिरीने वावरत आहेत. यामध्ये अनेकांना कोविडची लक्षणे असूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे. अशी लक्षणे असणारे रुग्ण कोविड चाचणी न करता घरीच उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे चार ते पाच दिवसांनी रुग्णाची प्रकृती गंभीर होते आणि त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागते. या कालावधीत अनेक रुग्णांची कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल येईपर्यंत आणखी दोन ते तीन दिवस उलटून जात असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होत आहे. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यावर कोरोनाचे उपचार केले जातात, मात्र तोपर्यंत रुग्ण त्याच्यावरील उपचाराला प्रतिसाद देत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी डेथ रिव्ह्यू कमिटीच्या बैठकीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांवर विचारविनिमय करण्यात आले. त्यामध्येदेखील उशिरा उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
जनजागृतीची गरज
कोरोनाचे वेळीच निदान झाल्यास रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे. याविषयी आवश्यक जनजागृतीची गरज आहे.