अकोला : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक आरोग्याबाबत जास्त जागरुक झाला आहे. विमा पॉलिसी काढण्यापासून सॅनिटायझर, मास्कचा उपयोग करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आरोग्याचा खर्च वाढला आहे. कोरोना कोळात सार्वजनिक आरोग्यव्यवस्था किती सक्षम आहे, त्याचे पितळ उघड पडले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: आरोग्याची काळजी घेणे आवश्यक बनले. कोरोनापासून बचावासाठी आरोग्याच्या सुविधांचा वापर वाढला. सुरुवातीला गरजेची न वाटणारी विमा पॉलिसी आता आवश्यक बनली आहे. सोबत दैनंदिन सॅनिटायझर, मास्कचा वापर वाढला आहे. कोरोनामुळे प्रत्येक कुटुंबाला अतिरिक्त आर्थिक झळ बसत आहे.
मास्क बनले गरजेचे
कोरोना काळात मास्क हे अतिआवश्यक बनले आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क हा लावावाच लागतो. बाहेर जाताना मास्क अनिवार्य आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाचा मास्कचा खर्च वाढला आहे. सुरुवातीला एन ९५ मास्क जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागले होते. कुटुंबातील एका व्यक्तीकडे दोन-तीन मास्क आहेतच.
विमा पॉलिसीने वाढला ९ ते १२ हजार रुपये खर्च
कोरोना काळाआधी मोजक्याच व जागरुक कुटुंबांकडून विमा पॉलिसी काढली जात होती. परंतु कोरोनामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे विमा पॉलिसी काढणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमीत कमी ९ ते १२ हजार रुपये प्रत्येक कुटुंबाचा हा वार्षिक खर्च वाढला आहे.
सॅनिटायझर मासिक खर्चात भर
सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोविड - १९ विरोधातील लढाईत आपल्याकडे शत्रूपासून बचावासाठी सॅनिटायझर ढाल बनला आहे. कामात असताना, प्रवासात हात स्वच्छ धुण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतो. सॅनिटायझरमुळे मासिक खर्चात आणखी भर पडली आहे. सहा जणांच्या कुटुंबाला महिन्याला अर्धा लीटर सॅनिटायझर लागत आहे.
घरी विलगीकरणातील खर्च अधिक
एखाद्या व्यक्तिला कोरोना झाल्यावर त्याला लक्षणे नसल्यास घरी विलगीकरणास परवानगी मिळते. या व्यक्तीवर अधिकचा खर्च कुटुंबाला करावा लागतो. बाधित रुग्णाला जेवणासाठी ताट न वापरता पत्रावळी दिली जाते. वेगळी सॅनिटायझर बॉटल, पिण्याच्या पाण्याची बॉटल देण्यात येते. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याने वापरलेल्या बहुतांश वस्तू फेकून दिल्या जातात. त्यामुळे या सर्व वस्तुंचा नाहक खर्च होतो.
फळे, भाजीपाला निर्जंतुकीकरणासाठी ‘व्हेजिटेबल क्लिनर’
कोरोनाचा विषाणू कोणत्या प्रकारे घरात येईल सांगता येत नाही. त्यामुळे फळे व भाज्या विकत आणल्यानंतर योग्य पद्धतीनं स्वच्छ करणे गरजेचे आहे. याकरिता व्हिनेगर, बेकिंग सोडा सोबत बाजारातील व्हेजिटेबल क्लिनर द्रव्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे हा खर्चही मासिक खर्चात जोडला जात आहे.
वाफ आणि काढा घेताय दररोज
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमीन सी अशा विविध औषधी घेतल्या जात आहेत. त्यासोबत आयुर्वेदीक काढ्याचा प्रयोग सुरू आहे. छातीत दाटलेला कफ दूर करण्यासाठी वाफ घेणे सुरू आहे. या काढ्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांचा खर्च, वाफ घेण्यासाठी अतिरिक्त गॅस खर्च होत आहे.