लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पातूर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात आश्रय दिलेल्या बाहेरगावच्या मजूर, विद्यार्थ्यांनी मंगळवारी मध्यरात्री पलायन केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यातील सर्वच आश्रयस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पातूर येथून पळून गेलेले मजूर कोरोनाचे संदिग्ध रुग्ण नव्हते. त्यामुळे ते ‘क्वारंटीन नव्हतेच फक्त लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले होते त्यामुळे भीतीचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे आणि वाहनांची सुविधा नसल्यामुळे पातूर पोलीस व तहसील प्रशासनाने इतर राज्य व जिल्ह्यांमधील मजूर, विद्यार्थ्यांना पातूर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. असे असतानासुद्धा घरी जाण्याच्या ओढीने आश्रयस्थानामधील मजूर व काही विद्यार्थी मंगळवारी मध्यरात्री पसार झाले. हे सर्व जण केवळ लॉकडाऊनमुळे ते अडकले होत त्यामुळे त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली होती. या व्यवस्थेत त्यांना नाश्ता, भोजन व मनोरंजनांची साधनेही पुरविण्यात आली होती हे सर्व लोक कोरोनाचे संदिग्ध रुग्ण नव्हते.त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आश्रयस्थानांवर परराज्य व इतर जिल्ह्यांतील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची निवास, भोजनासह व्यवस्था करण्यात आली. संचारबंदी संपल्यानंतर या सर्व लोकांना सोडण्यात येणार आहे. परराज्य व इतर जिल्ह्यांतील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांनी आश्रयस्थान सोडू नये, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून सहकार्य करावे, त्यासाठी जिल्ह्यातील आश्रयस्थानांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कोरोना : ३० जण पसार झाल्यानंतर आश्रयस्थानांवरील सुरक्षेत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:44 AM