- विजय शिंदेअकोट : संपूर्ण जिल्ह्यात पाय पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता अकोट शहरातही शिरकाव केला असून, येथील ७१ वर्षीय वृद्धाचा अकोला येथे केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल सोमवार, २५ मे रोजी आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच रुग्णाचे वास्तव्य असलेली गोकुळ कॉलनी सील करण्यात आली आहे. सदर व्यक्ती भाजीपाला व्यवसायाशी संबंतिध असल्याने शहरातील भाजी बाजार पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे.गोकुळ कॉलनी येथील वृद्ध आजारी होता. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती आहे. या डॉक्टरांकडून पुढील उपचाराकरीता अकोला येथे जाण्याचा सल्ला दिल्याने सदर रुग्ण हा अकोला येथे गेला होता. या ठिकाणी रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुणे घेण्यात आले. सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आाला. त्यामुळे सदर व्यक्तीवर अकोला येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, ही माहिती अकोट येथील प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने तहसीलदार राजेश गुरव, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, वैद्यकीय अधीक्षक स्नेहल रेड्डी, एसडीपीओ सुनील सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह वैद्यकीय पथक, महसूल विभागाचे पथक व आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.अवघ्या एका तासात नगर परिषदच्या आरोग्य विभागाने गोकुळ कॉलीनी परीसर सिल केला. तसेच सँनिटाइझर व फवारणी सुरु केली. आरोग्य व महसूल पथकाने कॉलनीमधील नागरिकांचा सर्वे सुरू केला आहे. त्यामध्ये नाव, गाव, वय व इतर बाबीच्या नोंदी करून घेण्यात येत आहेत. महसूल आरोग्य नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने रुग्णाच्या घरी भेट देऊन संवाद साधला त्याच्या घरातील सदस्यांची प्राथमिक तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची तयारी प्रशासनाने केली आहे.