- नितीन गव्हाळेअकोला: टेस्टी पाणीपुरी म्हटली की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लज्जतदार मसाल्याचे पाणी आणि त्या पाण्याने भरलेली पुरी खाण्याचा मोह कुणाला आवरत नाही. अकोल्याची पाणीपुरी तर सर्वात प्रख्यात, मात्र अशा खमंग, टेस्टी पाणीपुरीला कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. अकोला शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेला पाणीपुरीचा व्यवसाय सध्या ठप्प झाला आहे. संचारबंदीमुळे गत दिवसांपासून पाणीपुरीचा व्यवसाय बंद असल्याने, शहरातील ७ हजारांवर पाणीपुरी व्यावसायिकांना तब्बल ८0 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.महाराष्ट्रामध्ये अकोला शहराची टेस्टी पाणीपुरी प्रसिद्ध आहे. येथील पाणीपुरी खाण्यासाठी दुरदुरून खवय्ये येतात. त्यामुळे अकोला शहरात पाणीपुरी व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. शेकडो लोकांंनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाणीपुरी व्यवसायाची निवड केली. या व्यवसायातून मोठा रोजगार निर्माण होत असल्यामुळे अनेक लोक या व्यवसायासोबत जुळल्या गेले आहेत.
पाणीपुरीसोबतच जिभेचे लाड पुरविणारी खस्ता, दहीपुरी, भेळ, दाबेलीसुद्धा खवय्यांना भुरळ घालते. त्यामुळे या व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते; परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे पाणीपुरी व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. व्यवसायच बंद असल्याने, पुरी काढणाऱ्या व्यावसायिकांचा, पाणीपुरीचा मसाला तयार करणाºया व्यावसायिकांचा मोठा रोजगार हिरावल्या गेला आहे. या व्यवसायातून दररोज हजार, पंधराशे रुपयांची कमाई करणारे घरी बसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी काय करावे, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. यातून काहींनी पर्याय शोधत, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय अचानक ठप्प झाल्यामुळे हजारो व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.