लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर संख्या झपाट्याने वाढतच गेली. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. सोबतच कौटुंबिक हिंसाचारही वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात चार भिंती आड होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोरोना काळातही परिणाम जाणवला नाही. जितक्या घटना घडतात, त्याचा वेळेत तपास लावणे पोलिसांना शक्य होते. दरम्यान, जिल्ह्यात २०१९ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण 336घटना घडल्या. त्यातील 141 प्रकरणांमध्ये यशस्वी मध्यस्थी करून संसार सुरळित करण्यात आले. २०२० मध्ये 373 प्रकरणे दाखल झाली. त्यातील 189 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली; तर जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये 56 प्रकरणे दाखल झालेली आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात २०२० मध्ये माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेस मानसिक व शारीरिक त्रास देण्याची सर्वाधिक प्रकरणे घडली. त्यापाठोपाठ मूल होत नसल्याच्या कारणावरून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा समावेश आहे. त्यातील बहुतांश प्रकरणांचा पोलिसांनी छडादेखील लावला आहे.
तथापि, परिवारात एकमेकांसोबत वास्तव्य करीत असताना लहान सहान कारणांवरून संसार विस्कळित होत असल्यास शक्यतोवर मध्यस्थी करून संसार जुळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याची माहिती आहे.
माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा
लॉकडाऊन काळात अनेकांचा छोटा-मोठा उद्योग ठप्प झाला. काही लोकांना नोकरीदेखील गमवावी लागली. महानगरांमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिल्याने नोकरी सोडून अनेकांना गावी परतावे लागले. अशात आर्थिक चणचण भासू लागल्याने पत्नीकडे माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आल्याच्या तक्रारी २०२० मध्ये दाखल झाल्या आहेत..
189 प्रकरणांमध्ये मध्यस्थी
पोलीस दलातील महिला तक्रार निवारण कक्षात (भरोसा) दाखल कौटुंबिक हिंसाचाराच्या 189 प्रकरणांमध्ये मध्यस्थी घडवून आणण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. यामुळे तुटलेले अनेकांचे संसार पुन्हा जुळले असून तक्रारीही निकाली निघाल्या.