शिक्षण व्यवस्थेसोबतच आरोग्य यंत्रणाही बळकट असणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील खासगी आरोग्य यंत्रणा बळकट होत असली, तरी शासकीय आरोग्य यंत्रणा मागासलेलीच होती. मात्र गत वर्षभरातच कोरोनामुळे शासनाचे डोळे उघडल्याचे दिसून आले. कोरोनाचा कहर सुरू असताना शासकीय आरोग्य यंत्रणेवर रुग्णसंख्येचा भार वाढला. या काळात शासनाने प्राधान्याने लक्ष देत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाकडे वाटचाल सुरू केली. वर्षभरातच व्हेंटिलेटरची संख्या २० वरून ९० पर्यंत वाढविण्यात आली. ऑक्सिजनच्या खाटाही वाढविल्या. तसेच जिल्ह्यात ३० किलोलिटर एवढ्या क्षमतेने ऑक्सिजनची साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार केल्यास, आरोग्य यंत्रणा बळकट झाली आहे.
ग्रामीण भागातही झाले बळकटीकरण
आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांना थेट सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जात होते, मात्र गत वर्षभरात ग्रामीण रुग्णालयांमधील ऑक्सिजन खाटांची संख्या वाढली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सुरू करता येईल अशा कोविड केअर सेंटरची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक सुविधा
अकोला शहर वगळता जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक सुविधा वाढल्या आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात १० केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटाही वाढविण्यात आल्या आहेत. याशिवाय, खासगी कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरदेखील वाढविण्यात आले आहेत.
मागील वर्षभरात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरसोबतच ऑक्सिजनची समस्या मार्गी लावण्यात आली आहे. सर्वोपचार रुग्णालयातच ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणखी बळकट झाली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
आधी - नंतर
सरकारी रुग्णालय, कोविड सेंटर - ०९ - १६
खासगी रुग्णालये, कोविड सेंटर - ०० - २०
ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट - ०० - १
आयसीयु बेडची संख्या - ७० - २१०
व्हेंटिलेटर - ५० - १०५