अकोला : कोरोना या संसर्गजन्य आजाराने अकोल्यात प्रचंड धुमाकुळ घातला असून, या जीवघेण्या आजारामुळे बाधित होणाऱ्यांसह मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हा हादरला आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातही आता झपाट्याने प्रसार होत असून, बाळापूर शहरही नवे हॉटस्पॉट होण्याची चिन्हे आहेत. अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ होता. रविवारी यामध्ये तब्बल पाच जणांची भर पडत हा आकडा ५१ वर पोहचला आहे. रविवारी, अकोट फैल भागातील ६८ वर्षीय महिला, शंकर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला, बापूनगर येथील ५८ वर्षीय पुरुष व सिंधी कॅम्प येथील ५६ वर्षीय पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सिंधी कॅम्प येथील मृत रुग्ण हा खासगी इस्पितळात उपचार घेत होता. तेथे शनिवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आणखी २२ पॉझिटिव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण ९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७१ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन, तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फैल, तार फैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत ६२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत ३३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्राप्त अहवाल-९३पॉझिटीव्ह-२२(२१+१)निगेटीव्ह-७१
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७मयत-५१(५०+१),डिस्चार्ज-६२५दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१