रविवारी प्राप्त अहवालानुसार, शहरातील गुजराथी पुरा येथील सहा, सय्यद पुरा येथील एक, सोहेब कॉलनी एक, कासारखेड एक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, प्रशासनामार्फत कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ लस घ्यावी अथवा तपासणी अहवालाशिवाय कुठल्याही कार्यालयात प्रवेश बंद असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. शहरातील कार्यालयीन परिसरातच स्वॅब व आरटीपीसीआर तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे; मात्र शहरातील व्यावसायिक दुकाने सुरू ठेऊन नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असतानाच पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
-------------------------------------------
अकोट तालुका बनतोय ‘हॉटस्पॉट’; एका दिवसात तब्बल ६५ कोरोनाबाधित!
तालुक्याची एकूण रुग्णसंख्या पोहोचली २२६५ वर: १८५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
अकोट: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. अकोट तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून रविवारी प्राप्त अहवालानुसार, तब्बल ६५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र असून, ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्यस्थितीत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या २२६५ वर पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात १८५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसत नसल्याने कोरोनाचा दैनंदिन आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी एकदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसर सील करणे व इतर उपाययोजना केल्या जात होत्या; मात्र सद्यस्थितीत तसे केले जात नाही. होम क्वारंटाईन असलेले रुग्ण दिवसभर शहरात वावरताना दिसून येत आहेत. तसेच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, नागरिक विनामास्क मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
---------------------
बाजारपेठेसह दुकानात नियमांचे उल्लंघन!
शहरातील बाजारपेठेत नागरिक विनामास्क वावरत आहेत. तसेच दुकानांमध्ये दुकानदारांसह ग्राहक विनामास्क दिसून येत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काेरोनाला रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------------