अकोला : अकोल्यात कोरोनाचा दुसरा संशयित रुग्ण शनिवारी सकाळीच दाखल झाला. संशयित रुग्ण हा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ३३ वर्षीय युवक आहे. त्यावर सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले.मूळ मालेगाव तालुक्यातील (जि. वाशिम) ३३ वर्षीय युवक आॅस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा सामना बघायला गेला होता. आॅस्ट्रेलियातून भारतात परतल्यावर तो त्याच्या मूळ गावी आला. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गत दोन दिवसांपासून त्याला सर्दी, खोकल्यासह ताप आल्याने तो आजारी पडला. विदेशातून आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने युवकाने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. त्याला शनिवारी सकाळीच आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या लाळेचे नमुने घेतले असून, ते वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याला पाठविले. तपासणीचा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. अहवालाची प्रतीक्षा असून, आरोग्य विभाग संशयित रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष देऊन आहेत. यापूर्वी ७ मार्च रोजी जर्मनीहून आलेली २४ वर्षीय युवती कोरोनाची संशयित रुग्ण म्हणून दाखल झाली होती. अहवालात कोरोना निगेटिव्ह आल्याने युवतीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.
CoronaVirus : सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाचा संशयीत रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 4:53 PM