----------------------
अकोट शहरातील रस्ते दुरुस्तीची गरज
अकोट : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरुस्तीची गरज आहे. अनेक भागात मोठे खड्डे पडले असून, यामध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
-------------------
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
बाळापूर : तालुक्यातील अनेक शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदीकाठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरून पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
-------------------
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पोलिसांना माहिती असली तरी कारवाईसाठी पुढाकार घेत नाही.
---------------------
कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची मागणी
पातूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.
-----------------------
ग्रामीण नागरिकांना मास्कची ॲलर्जी
वाडेगाव : देशभरात कोरोनाचा आहे; मात्र अनेक नागरिक गर्दीच्या ठिकाणी मास्क लावतच नाहीत. काही नागरिक मास्क वापरतात; परंतु नाका तोंडावर न लावता गळ्या सभोवताली लटकवून ठेवताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग गतीने वाढण्याची चिन्हे आहेत.
----------------------
पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा
अकोला : जिल्ह्यातील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. याकडे लक्ष देऊन उपसा थांबविण्याची मागणी होत आहे. वाळूमाफिया अवैध उत्खनन करीत असून, लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
--------------------------
अवैध प्रवासी वाहतुकीत वाढ
चोहोट्टा बाजार : अकोट ते अकोला महामार्गावर असलेल्या अनेक लहान गावांत आता लाॅकडाऊन काळात कमी बसेस जात आहे. परिणामी, प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
------------------------------------
चान्नी परिसरात दारूविक्रेते, मद्यपींचा हैदोस
खेट्री : चान्नी परिसरातील गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून खुलेआम दारूविक्री सुरू आहे. मद्यपी दारू पिऊन शांतता भंग करीत आहे. पोलिसांनी दारूविक्रेते आणि मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
---------------------------
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
तेल्हारा : तालुक्यातील बहुतांश गावांत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा प्रचंड अभाव दिसून येतो. यामुळे विविध आजार डोके वर काढत आहे. नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देत स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
-----------------
पानमसाला, तंबाखूची सर्रास होतेय विक्री
पातूर : युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची क्रेझ वाढत चालली आहे. राज्यात बंदीनंतर अवैध मार्गाने याची राजरोसपणे विक्री होताना दिसून येत आहे. व्यसनाला युवा पिढी बळी पडत आहे. शहरात खर्रा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याचे दिसून येत आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.
------------------
खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
मूर्तिजापूर : शहरातील अंतर्गत रस्त्यांची मागील काही दिवसांपासून प्रचंड दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. संबंधित विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.