विजय शिंदे
अकोटः तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शभंरी ओलांडली आहे. गत १९ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या संख्या दि. १९ फेब्रुवारी सकाळी पर्यंत १६२ वर पोहोचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पंधरवड्यातील हा सर्वात मोठा आकडा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे नियमाची उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
अकोट शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बसस्थानक, चौका-चौकात व बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नव्हते. विशेष करून खासगी बस व वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी कोंबले जात असल्याचे चित्र दिसून येत होते. खासगी बाजारपेठ, शासकीय-निमशासकीय कार्यालयात सुद्धा कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नव्हते. परिणामी, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. अकोट तालुक्यातील १ ते १९ फेब्रुवारीपर्यंत १६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोद आहे. ग्रामीण भागात ११ तर शहरात ९३ रुग्ण आहेत. शिवाय दि. १८ फेब्रुवारी रोजी २२ रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. सध्या अकोट शहरात हायरिक्स रुग्ण संख्या ५२८ तर ग्रामीण भागात १११ पोहोचली आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये व्यापारी असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
स्थानिक महसुल,नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने अकोट शहरातील प्रमुख रस्त्यावर व बाजारपेठेत , दुकानात मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केल्या जात नाही. असा नागरिक, दुकानदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासाठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांत प्रत्येकी चार जणाचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.