बाळापूर : आसाम राज्यातील कोरोनाग्रस्ताने अकोल्यातील सर्वोपचारमध्ये ११ एप्रिल रोजी आत्महत्या केली. हा रुग्ण बाळापुरात एक महिना मुक्कामी थांबल्याने त्याच्या सहवासात आलेल्या सात ते आठ जणांना स्थानिक प्रशासनाने तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.आसाम येथील एक युवक कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. हा युवक कोठून आला, याची चौकशी प्रशासन करीत असतानाच त्याने ११ एप्रिल रोजी आत्महत्या केली. हा कोरोनाग्रस्त युवक ९ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत बाळापूरमधील मदरशात व मशीदमध्ये मुक्कामी होता. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, नगर परिषद मुख्याधिकारी जी. एस. पवार, ठाणेदार नितीन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इशरत खान व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दिवसभर विचारपूस केली. यादरम्यान, सात ते आठ जण संदिग्ध वाटल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले.
एक महिना बाळापूरमधील मदरशात व मशीदमध्ये असल्याने व त्याला अकोला येथे रुग्णालयात दाखल करणारा कोण, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणीसाठी नेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे. ९ मार्चपासून तो बाळापूरात होता. मध्यंतरी २२ दिवसांचे मोबाइल लोकेशन पोलिसांना तपासात मिळाले नाही. (शहर प्रतिनिधी)