अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली असली तरी, दररोज एकेरी आकड्याने रुग्णवाढ होतच आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नव्याने पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तथापी, कोरोनाची लागण होणाऱ्यांपैकी किती जणांनी लस घेतली, याबाबतची नोंद आरोग्य विभाग ठेवत नसल्याचे समोर आले आहे. गत सात दिवसात २५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परंतु, यापैकी किती जण लसीकृत होते, याबाबत कोणतीही आकडेवारी आरोग्य विभागाकडे आढळून आली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५७,७९२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ११३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, आतापर्यंत ५ लाख ५९ हजार ८७५ नागरिकांचे लसीचे एक किंवा दोन डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख वेगाने खाली येत आहे. गत सात दिवसात जिल्ह्यात केवळ २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांपैकी किती जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली, याबाबतची नोंद ठेवणे गरजेचे असताना जिल्हा स्तरावर आरोग्य विभागाकडे अशी कोणतीही नोंद नसल्याचे वास्तव आहे. रुग्ण जेथे उपचार घेत आहेत, त्या ठिकाणी ती नोंद असू शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कधी किती पॉझिटिव्ह...
वार रुग्ण
बुधवार - ७
गुरुवार - ३
शुक्रवार - ६
शनिवार - ०
रविवार - ६
सोमवार - १
मंगळवार - २
तालुकानिहाय लसीकरण...
तालुका पहिला डोस दुसरा डोस
अकोला - ३६,४२८ - १२,०७७
अकोट - २८,०८५ - ८८०९
बार्शीटाकळी - २१,००८ - ६५५६
बाळापूर - २५,२१२ - ७००३
मूर्तिजापूर - २५,४३२ - ६५४०
तेल्हारा - २१,५८७ - ८२८५
पातूर - २५,२३३ - ६३४७
बार्शीटाकळी तालुक्यात सर्वात कमी लसीकरण
जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बार्शीटाकळी तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी लसीकरण झाल्याची नोंद आहे. या तालुक्यात २१,००८ जणांनी पहिला, तर ६५५६ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. अकोला तालुक्यात सर्वाधिक ३६,४२८ जणांनी पहिला, तर १२,०७७ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यापाठोपाठ अकोट, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, तेल्हारा असा क्रम आहे.