अकोला : कोरोना विषाणू पार्श्वभुमिवर व त्या अनुषंगाने अंमलात असलेल्या लॉक डाऊन कालावधीत प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
येथील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची रुग्ण संख्या, त्यांच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या चाचण्या, त्यांच्यासाठी राबवावयाची उपचार पद्धती याबाबत डॉ. घोरपडे यांनी माहिती दिली. जिल्ह्यात सध्या बाहेरुन आलेल्या प्रवाशांची संख्या २७ हजार ४९६ असून त्यापैकी प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात २६ हजार ७९२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ७०४ जण अजूनही गृह अलगीकरणात आहेत.
त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोना अनुषंगाने लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोरोना संसर्गितांच्या राहण्याच्या ठिकाणानुसार प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून त्यात अकोला शहरात बैदपूरा व अकोट फैल. पातूर व बाळापूर असे चार प्रतिबंधित क्षेत्र असून या प्रतिबंधित क्षेत्रात १५० पथकांची नियुक्ती करुन १४६०० घरांमधील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अंती संदिग्ध लक्षणे आढळलेल्या २६६ जणांना अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात उपचार सुविधेचीही पूर्व तयारी करण्यात आली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ऐनवेळीची आवश्यकता भासल्यास आयकॉन हॉस्पिटल १५० खाटा व ओझोन हॉस्पिटल १०० खाटा अशी एकूण ३८२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सौम्य लक्षणे आढळणाऱ्या संदिग्ध रुग्णांसाठी कोविड हेल्थ सेंटर जिल्ह्यात सहा ठिकाणी तयार करण्यात आले असून त्यात ३७० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ज्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवायचे आहे अशांसाठी जिल्ह्यात १४ कोवीड केअर सेंटर्स तयार करण्यात आले असून त्यात ११५० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आवश्यक सामुग्री पी पी ई किट्स, एन ९५ मास्क, ट्रिपल लेयर मास्क व तत्सम साहित्य हे पुरेशा प्रमाणात आहे. तसेच औषधीचा पुरेसा साठा आहे.
जिल्ह्यात २५ ठिकाणी स्थलांतरीत परप्रांतिय मजूरांचे आश्रयस्थाने तयार करण्यात आले असून २०४८ जणांनी त्यात आश्रय घेतला आहे. त्यांचे निवास, भोजन, वैद्यकीय तपासणी आदी प्रकारची व्यवस्था त्यात करण्यात आली आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थांकडून जिल्ह्यात २५ सामुहिक स्वयंपाक गृहे तयार करण्यात आली असून २०३९ लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे. तसेच दहा शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाले असून त्यामार्फत १६०० हून अधिक थाळ्यांचे जेवण गरजूंना दिले जात आहे. जिल्ह्यात पुरेसा भाजीपाला, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. काळाबाजार, साठेबाजी होऊ नये म्हणून प्रत्येक तालुकास्तरावर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय गॅस वितरण, घरपोच किराणा आदी उपाययोजना राबवून लोकांना वस्तू पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात लॉक डाऊन काळात विविध विभागांमार्फत विविध कामांसाठी एकूण २९७७ परवानग्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वस्त धान्य दुकानांद्वारे विविध योजनांमधून होत असलेल्या धान्य वितरणाची माहिती देण्यात आली. तसेच महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना कामांबाबतही माहिती देण्यात आली. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व पिक कर्ज योजना याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले की, कोवीड बाबत उपाय योजना सुरु असतांना कोवीड व्यतिरित अन्य वैद्यकीय उपचार सुविधा सुरु असल्या पाहिजेत. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रमही सुरु असला पाहिजे. जिल्ह्यात सुरु झालेल्या उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठीचे नियोजन करुन ऐनवेळी कोठेही पाणी टंचाई भासू नये यासाठी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी कोवीड चाचणी प्रयोगशाळा येथेही भेट देऊन माहिती जाणून घेतली.