कोरोनाच्या संकटात कौटुंबिक कलह ही वाढले
अकोला : कोरोनाचे भीषण संकट एक वर्षांपासून सुरू असल्याने आता अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, शासनाने विविध कडक निर्बंध लागू केलेले आहेत, प्रत्येकापुढे आर्थिक संकट वाढत असल्याने याचा परिणाम कौटुंबिक शांततेवर झाल्याचेही आता समोर आले आहे. त्यामुळे कोरोना काळातील या तीन महिन्यात जिल्ह्यात १३ जणांचे घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे कौटुंबिक घडी विस्कटल्याची माहिती उघडकीस आली आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. काम आटोपल्यानंतर पती निव्वळ मोबाईलमध्ये गुंग असतो तर पत्नी सर्व कामधंदे सोडून मोबाईलच पाहत असल्याने कौटुंबिक कलह निर्माण झाले आहेत. रोज खटके उडत असल्यामुळे चिडचिड ही वाढली आहे. याच कारणावरून कौटुंबिक वाद थेट भरोसा सेल, महिला तक्रार निवारण केंद्र व पोलीस ठाण्यापर्यंत आलेले आहेत ; मात्र पोलिसांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अनेक दाम्पत्य हे जुळवून घेण्याच्या तयारीत नसल्याने त्यांचे खटले आता न्यायालयात दाखल केले आहेत. कौटुंबिक न्यायालयामध्ये असे खटले आता सुरु असून अनेकांनी सोबत राहणे न पसंत केल्यामुळे त्यांना घटस्फोट देण्याची प्रक्रियाही कौटुंबिक न्यायालयात झालेली आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातही गत काही दिवसांमध्ये १३ जणांनी घटस्फोट घेतला आहे. कोरोना काळातील तीन महिन्यात १३ जणांनी घटस्फोट घेतला असून त्यांनी विभक्त होऊन आयुष्याची पुढील वर्ष सुखाने काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पतीचा रोजगार गेल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे. सहा महिन्यात घरातच बसून असल्याने दोघांमध्ये वाद झाले आहेत. याच कारणावरून घटस्फोट देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
घटस्फोटीत महिला
मी मोबाईल वापरते या कारणावरून पतीसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. त्यामुळे सोबत राहण्यापेक्षा मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तीन ते चार वर्षांपूर्वी न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर घटस्फोट मिळाला.
संशयी वृत्तीमुळे मी घटस्फोट घेतला आहे.
एक पीडित महिला