अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाने प्रचंड वेग घेतला असून, गत २४ तासांत ९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शनिवारी नोंद झालेल्या ९० रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा २६७ वर गेला आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा आलेख अचानक उंचावला असून, कम्युनिटी स्प्रेडचे हे संकेत असल्याचे बोलले जात आहे. शासकीय वेद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ५२६ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ४७ जण हे अकोला शहरातील, १९ जण मुर्तिजापुर येथील तर चार जण अकोट येथील रहिवासी आहे. खासगी प्रयोगशाळेतही १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर २११ रॅपिड ॲटिजेन चाचण्यांमध्ये ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेली असून, त्यापैकी अनेक जण गृहविलगीकरणातच असल्याची माहिती आहे.
सहा दिवसांत २५४ रुग्णांची भर
जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत कोरोना संसर्गचा आलेख स्थिर होता. सोमवार, ३ जानेवारीपासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. रविवारपर्यंत जिल्ह्यात केवळ १३ सक्रिय रुग्ण होते. सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्येच २५४ नव्या रुग्णांची भर पडत सक्रिय रुग्णांचा आकडा २६७ वर गेला आहे.