अकोला : ‘कोरोना’ आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असलेल्या संशयित रुग्णाचा वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयातून त्या युवतीला सुटी दिली जाणार आहे.ही युवती विदेशातून आल्यानंतर आजारी पडल्याने सतर्कता म्हणून तिच्यावर ‘कोरोना’ आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत.शनिवारी युवती रुग्णालयात दाखल होताच तातडीने आवश्यक नमुने कोरोना तपासणीसाठी नागपूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास युवतीचा वैद्यकीय अहवाल कोरोना ‘निगेटिव्ह’ असल्याचे समजल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांसह संशयित रुग्ण व तिच्या कुटुंबीयांनीदेखील सुटकेचा श्वास घेतला. रुग्णाला साधा ताप असून, घाबरण्यासारखे कारण नसल्याची माहिती येथील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अकोल्यात अद्याप कोरोनाचा प्रवेश झालेला नसल्याने अकोलेकरांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही यावेळी रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
सतर्कता आवश्यकविदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी आरोग्य यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे. अशातच शनिवारी अकोल्यातील एका युवतीला साधारण ताप असला तरी, ती विदेशातून आल्याने आरोग्य यंत्रणेने विशेष खबरदारी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, विदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोनाचे कुठलेही एक लक्षण आढळल्यास त्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार करणे आवश्यक आहे.
त्या युवतीचा वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती नागपूर येथील डॉक्टरांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितली. त्यामुळे सोमवारी सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाला सुटी दिली जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही; परंतु सतर्कता आवश्यक आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्कता म्हणून संबंधित रुग्णाला कोरोना वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले होते.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.