- संतोषकुमार गवईशिर्ला/पातूर: हैदराबादला घरी जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईहून पायी निघालेली महिला पातुरात पोहोचली. तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता संदिग्ध आढळल्यामुळे तिला अकोला येथे हलविण्यात आले. महिलेसह पातुरातील संदिग्धांची सख्या १६ वर पोहोचली आहे. मुंबई येथे राहत असलेली एक ५० वर्षीय महिला ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर हैदराबाद येथे जाण्यासाठी पायी निघाली. मुंबईपासून पायी प्रवास करीत ती पातूरला पोहोचली. येथे तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ती कोरोना संदिग्ध आढळून आली. त्यामुळे तातडीने तिला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गत दोन-तीन दिवसांपासून पातूर शहर मेडशी येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णामुळे प्रकाशझोतात आले आहे. या रुग्णासोबत पंधरा जणांचा थेट संपर्क आल्यामुळे गत दोन दिवसांत पातूरच्या पंधरा कोरोना संदिग्ध यांना अकोला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालाची प्रतीक्षा पातूर प्रशासन तथा नागरिक करीत आहेत. गत दोन-तीन दिवसांच्या कोरोना संदिग्ध यांच्या घटनाक्रमाने पातूर तालुका हादरला आहे. सध्या सर्वजण दहशतीखाली वावरताना दिसतात. कोरोनाचे संकट अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. पातूर आणि शिर्ला ग्राम प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या असून, संदिग्ध राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. संदिग्ध रुग्ण जर ‘पॉझिटिव्ह’ निघाल्यास प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, असे आवाहन शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे आणि पातूर नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले आहे.
मुंबईहून हैदराबादला पायी निघालेली महिला कोरोना संदिग्ध;पातुरवरून अकोला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 4:37 PM