लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनावर कुठलाच उपचार नाही, औषध नाही, लस नाही; मग रुग्णालयात उपचार होतो तरी कशाचा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद््भवतात; मात्र उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.कोरोना आणि त्याच्या उपचार पद्धतीवर अनेकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जातात. कोरोनाचा रुग्ण म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळते म्हणून अनेक जण रुग्णालयात जाणेही टाळतात. शिवाय, सुटी देण्यापूर्वी त्याची पुन्हा चाचणी होत नसल्याने तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, या भीतीने अनेक जण त्या रुग्णाजवळही जाण्यास टाळतात.नागरिकांच्या मनातील भीती आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. काय म्हणतात हे डॉक्टर जाणून घेऊया.
रुग्णाला केव्हा दाखल केले जाते?सर्वप्रथम रुग्णाची प्राथमिक चाचणी केली जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. सोबतच त्याचा स्वॅब घेण्यात येतो. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड वॉर्डात दाखल केले जाते. अन्यथा इतर आजारावर आवश्यक उपचार देऊन रुग्णाला सुटी दिली जाते.
रुग्णालयात अशी आहे रुग्णांची दिनचर्यासकाळी ८ वाजता नाश्ता दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पोहे, उपमा, बिस्कीट, दूध किंवा चहा. दुपारी १२ वाजता जेवण. यामध्ये कडधान्य असलेली भाजी, वरण भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळे. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत होते.
दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरीकोविड वॉर्डात दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरी असते.यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास यावर विशेष लक्ष दिले जाते.
‘त्या’ रुग्णांपासून संसर्गाचा धोका नाहीउपचारानंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे नसतील, तर त्याला दहाव्या दिवशी सुटी देण्यासंदर्भात आयसीएमआरच्या निर्देश आहेत. हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून संसर्ग होण्याची भीती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात नाही.
रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असतो. त्या अनुषंगाने रुग्णांना पौष्टिक आहार दिला जातो. रुग्णाला लक्षणे असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला सुटी दिली जात नाही.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला