अकोला: आतापर्यंत कोरोनाच्या नावावर औषधांचा काळाबाजार सुरू होता; पण आता चाचण्यांचाही गोरख धंदा सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मान्यता नसतानाही अकोल्यातील मंत्री लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नमुने संकलीत करून ते तपासणीसाठी ठाण्याला पाठविण्यात येत असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलवरून लक्षात येताच संबंधित लॅब संचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयसीएमआरची मान्यता मिळविणे आवश्यक आहे; मात्र सिव्हिल लाइन्सवरील मंत्री लॅबमध्ये मान्यतेविनाच कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅॅब संकलन करून ते तपासणीसाठी ठाणे येथील इंफेक्शन लेबॉरेटरीजमध्ये पाठविली जात होती. नियमानुसार, संकलित नमुन्यांचे अहवाल संबंधित लॅबमार्फत आयसीएमआरच्या पोर्टलवर टाकणे बंधनकारक आहे. त्यानुसार, इंफेक्शन लेबॉरेटरीजमार्फत अकोल्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत तफावत दिसून आली. ठाण्यातील लॅबद्वारे दिलेली माहिती ही जिल्ह्यातील मान्यताप्राप्त स्वॅब संकलन केंद्रावरील नसल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत मंत्री लॅबवर बनावट रुग्ण पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील परिस्थिती जाणून घेतली अन् कोरोना चाचणीचा हा गोरख धंदा उघडकीस आला. याप्रकरणी अकोल्यातील मंत्री लॅबचे संचालक डॉ. राम मंत्री यांच्यासह ठाण्यातील इंफेक्शन लेबॉरेटरीजचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांच्या विरोधात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गत काही दिवसांमध्ये या ठिकाणी शेकडो संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे; मात्र यातील पॉझिटिव्ह रुग्णांबाबत जिल्हा प्रशासन अंधारात असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
अप्रशिक्षित कर्मचारी
मंत्री लॅब येथे स्वॅब संकलनाची जबाबदारी देण्यात आलेला वाहुरवाघ नामक कर्मचारी अप्रशिक्षित असल्याचे निदर्शनास आले. मंत्री लॅबची पाहणी करण्यासाठी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर मुदगल, डॉ. अनुप चौधरी हे गेले असता, काही गंभीर प्रकार त्यांच्या लक्षात आले.
आयसीएमआरच्या पोर्टलवर ठाणे येथील एका लॅॅबकडून अकोल्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती टाकण्यात आली. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. जिल्हा प्रशासन पूर्णत: डॉक्टरांच्या पाठीशी आहे, त्यासाठी डॉक्टरांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.