अकोला : शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी व दुकानातील कामगारांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येथील बाजार समितीत कोरोना टेस्ट कॅम्प झाला. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट केली; मात्र बहुतांश हमाल व मजूर स्वत:हून टेस्ट करण्यासाठी पुढे आले नसल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली.----------------------------------------------
ढगाळ वातावरणाने चिंता वाढविली !
अकोला : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. डोळ्यांपुढे पिकाची नासाडी होत असल्याने पाहून शेतकरी हतबल झाला आहे. हे अवकाळीचे सावट आणखी काही दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यातच मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.
----------------------------------------------
दरवाढीचा व्यापाऱ्यांना फायदा
अकोला : खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मालाचा दर्जाही घसरला. त्यामुळे सोयाबीन कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकावे लागले. आता सोयाबीनला चांगले भाव मिळत असून बाजार समितीत आवक वाढली आहे; मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर भाव वाढ झाली आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. बुधवारी बाजार समितीत २ हजार १५१ क्विंटलची आवक झाली होती.