- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चिमुरड्याला जन्म दिल्याने मातृत्वाचा आनंद तर मिळाला; पण कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने त्या माय-लेकाची ताटातूट झाली. ही अकोल्यातील दुसरी घटना असून, पुढील पाच दिवसांत त्या शिशूंचीही चाचणी केली जाईल; पण मातृत्व सुखासाठी आता त्या मातांना स्वत:ला कोरोनामुक्तीचा लढा द्यावा लागेल.जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी गाठली असून, मृतकांचाही आकडा वाढत आहे. अशातच गर्भवतींनाही कोरोनाचा धोका वाढत असून, शनिवारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील आणखी एका गर्भवतीचा अहवाल प्रसूतीनंतर ‘पॉझिटिव्ह’ आला. ही २६ वर्षीय महिला खंगरपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गुरुवारी अकोट फैल परिसरातील एका मातेचा शिशूच्या जन्मानंतर आलेला अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे या माय-लेकाची ताटातूट झाली अन् त्या मातांची मातृत्व सुखाची चिंता वाढली. सध्या या दोन्ही माता सर्वोपचार रुग्णालयात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इवल्याशा जीवाला उभारी देण्यासाठी त्या मातांना आता कोरोनामुक्तीचा लढा द्यावा लागेल.
आईचे दूध चालते, पण...नवजात शिशू फोरमच्या मार्गदर्शक अहवालानुसार, कोरोना संदिग्ध किंवा बाधित माता असेल, तरी त्या मातेचे दूध नवजात शिशूला देता येते; परंतु शिशूला दूध देण्यापूर्वी मातेने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याची गरज आहे.
चार गर्भवतींची तपासणीअकोट फैल परिसरातील अशोक नगर या प्रतिबंधित क्षेत्रातील चार गर्भवतींची कोरोना चाचणी जिल्हा स्त्री रुग्णालयातर्फे करण्यात आली आहे. या चारही गर्भवतींच्या प्रसूतीचा शेवटचा आठवडा असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयातर्फे काळजी घेण्यात येत आहे.
३४ अहवाल ‘निगेटिव्ह’जिल्हा स्त्री रुग्णालयात ४३ गर्भवती व मातांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ३४ अहवाल ‘निगेटिव्ह’, तर दोन अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. उर्वरित सात अहवालांची प्रतीक्षा आहे.
प्रसूतीच्या शेवटच्या आठवड्यातच करा तपासणी‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भागातील गर्भवतींनी प्रसूतीच्या शेवटच्या आठवड्यातच तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे माता व शिशूसह अनेकांचा कोरोनापासून बचाव करणे शक्य होईल.
अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.- डॉ. आरती कुलवाल,वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.