कोरोना चाचणी अहवालाच्या दिरंगाईमुळे कोरानाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
अकोट तालुक्यात विशेषत: शहरात कोरोना रुग्णांची चाचणीच्या माध्यमातून शोध मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाची प्राथमिक चाचणी घेतल्यानंतर त्या व्यक्तीला मोकळे सोडून देण्यात येत आहे. त्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्वारंटाईन किंवा पाटसुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. शिवाय त्याच्या घराच्या भिंतीवर ‘कोविड - १९ प्रतिबंधित क्षेत्र’ असे फलक लावण्यात येत आहेत. परंतु त्याचा अहवाल येईपर्यंत सदर व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या कार्यपद्धतीने कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे, तर दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना रुग्ण गावात फिरत आहेत, यावर कोणाचाही अंकुश दिसून येत नाही. वाढत्या आकडेवारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु या लॉकडाऊनमध्ये एस.टी. बसेस, बँका, हॉटेल्स पार्सल आदींसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांवर लोकांची गर्दी कायम आहे. शिवाय प्रशासनाने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असला तरी परिस्थिती जैसे थेच आहे. शिवाय कोरोनाची लस ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात गर्दी होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सुविधा नाहीत
ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यांनी स्वत:हून तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु थेट चाचण्याच घेतल्या जात असल्यामुळे व त्याचा अहवाल लवकर येत नसल्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीमागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.