अकोला : कोरोनाचे थैमान सुरूच असून, वर्षाअखेरीसही कोरोनाने तिघांचा बळी घेतला आहे. ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये आरटीपीसीआरच्या ३१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचणीच्या ११ अहवलांचा समावेश आहे. कोरोनाचा हा धोका नव्या वर्षातही कायमच असून, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गत नऊ महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, वर्षाच्या शेवटच्या दिवशीही तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये देशमुख फाइल, रामदास पेठ येथील ७९ वर्षीय रुग्णाचा समावेश असून, त्यांना २५ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले हाते. दुसरा ७० वर्षीय रुग्ण खेताननगर कौलखेड येथील रहिवासी होता. त्यांना ९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील वंजारीपुरा येथील ५२ वर्षीय रुग्णाचा ही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २५ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी प्राप्त आरटीपीसीआरच्या ३१ पॉझिटिव्ह अहवालात गोरक्षणरोड येथील चार, शास्त्रीनगर, बाळापूर नाका, निखील किबे वाडा खोडके हॉस्पिटल, सिव्हिल लाइन व खदान येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पुन्दा, ता. अकोट, केडिया प्लॉट, कौलखेड, मोठी उमरी, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, कामा प्लॉट, मूर्तिजापूर, पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, पोलीस स्टेशन रामदासपेठ, नजरिया हाऊस मूर्तिजापूररोड, नानकनगर, जठारपेठ, पक्की खोली सिंधी कॅम्प, बार्शिटाकळी, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच ११ अहवाल हे रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले. तसेच गुरुवारी १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दहा हजार ४८९वर पोहोचला असून, त्यापैकी ९,७४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
४०९ रुग्णांवर उपचार सुरू
सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ४०९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आले आहे.
मृत्युदर ३ टक्क्यांवर
वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्युदरही अकोलेकरांची चिंता वाढवत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा मृत्युदर ३ टक्क्यांवर आला असून, गत आठवडाभरात यामध्ये ०.५ टक्क्यांनी घट झाली आहे.