लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात गत चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. जून महिन्यापर्यंत किरकोळ अपवाद वगळता प्र्रामुख्याने अकोला शहरापुरत्या मर्यादित असलेल्या कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, गत दहा दिवसांत जिल्हाभरात आढळलेल्या एकूण ४२४ रुग्णांपैकी तब्बल २६६ रुग्ण हे तालुक्याची शहरे व ग्रामीण भागातील आहेत. याच कालावधीत अकोला शहरात १५८ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळल्याचे दिसून येत आहे.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मंगळवार, २८ जुलैपर्यंत एकूण रुग्णसंख्या २,४९६ झाली असून, मृतांचा आकडाही १०३ वर गेला आहे. एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आलेल्या अकोल्यात गत मे महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. जून महिन्यात ‘अनलॉक’नंतर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सुरुवातीला अकोला शहरातील बैदपुरा, अकोट फैल, सिंधी कॅम्प, फिरदौस कॉलनी या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यामुळे हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अकोला शहरातील रुग्णवाढीला किंचितसा ‘ब्रेक’ लागला आहे. दरम्यान, याच कालावधीत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रॅपिड अॅन्टिजन चाचणी मोहीम सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५,८६५ रॅपिड चाचण्या झाल्या असून, यामध्ये ३०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १९ जुलै ते २८ जुलै या दहा दिवसांचा विचार केल्यास या कालावधीत एकूण ४२४ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ग्रामीण भागात २६६, तर अकोला शहरात १५८ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला शहरातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याने अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बाब असली, तरी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
पातूर-बाळापुरातही कहरजिल्ह्यात अकोला शहरानंतर सर्वप्रथम पातूर शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. अजूनही पातूर तालुक्यात रुग्ण आढळून येत आहेत. बाळापूर शहरही कोरोनाचे केंद्र बनले असून, बाळापूरात आतापर्यंत १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेल्हारा तालुक्यातही आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले आहेत.
अकोट तालुका नवा हॉटस्पॉटजुलै महिन्यात अकोट शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. तालुक्यात आतापर्यंत २०४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अकोट शहरातील रुग्णांची संख्या जास्त आहे.