- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोना या अत्यंत संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी लस वरदान ठरली असून, जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून २० जुलैपर्यंत तब्बल ५ लाख ४ हजार १३४ जणांनी लस घेतली आहे. यापैकी ३,८०,११० जणांनी पहिला डोस आहे, तर १,२४,०२४ जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरासह जिल्ह्यातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी फ्रंटलाइन वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. गरजेनुसार, मोहिमेंतर्गत टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा होत आहे. मध्यंतरी ४५ वर्षांवरील नागरिक तसेच १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. आरोग्य विभागाच्या मोहिमेला अकोलेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ३,८०,११० जणांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. तर १,२४,१२४ नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेला गती दिल्याने आतापर्यंत २५ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण
लसीकरण माेहिमेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा प्रतिसाद लाभत असला, तरी ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी सर्वाधिक लस घेतल्याची नोंद आहे. या वयोगटातील ३,३६,७६९ जणांनी लस घेतली आहे. यापैकी २,३७,६९३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ९९,०७६ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.
८.३८ टक्के नागरिकांना दोन्ही डोस
लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील १४,६९,४४२ नागरिकांना लसीकृत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ८.३८ टक्के अर्थातच १,२४,०२४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एक डोस घेणार्यांची टक्केवारी २५.६९ एवढी आहे. ३,८०,११० जणांनी लसीचा पहिला डोस घेऊन झाला आहे.
जिल्ह्यासाठी पुरेशा लसी उपलब्ध असून, लसीकरण मोहिमेला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असून, नागरिकांनी लसीच दोन्ही डोस घ्यावे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम, अकोला