अकोला : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किमान ३० मिनिटे लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. मात्र, अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जिवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते. कोविड लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात होती. मात्र, आता पुन्हा ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता वाढण्याची शक्यता आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. मात्र, लस घेताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालनही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात किमान ३० मिनिटेही कोणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येते. लस घेतली की, चार ते पाच मिनिटांतच लाभार्थी लसीकरण केंद्राबाहेर निघून जातात.
...म्हणून लसीकरणानंतर ३० मिनिटे थांबणे आवश्यक
कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना काही दुष्परिणाम जाणवतात. हे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात का? हे लसीकरणाच्या अर्ध्या तासात समजू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचारही घेणे शक्य होते. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे लसीकरणानंतरचा अर्धा तास महत्त्वाचा असतो. मात्र, हा त्रास सर्वांनाच होईल असे नाही. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
लस हेच औषध
कोरोनावर अद्यापही ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे लस हेच प्रभावी औषध ठरले आहे.
लसीकरणामुळे कोविड संसर्गाचा धोका कमी आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूप कमी राहते.
लस घेतल्यानंतरही नियम आवश्यक
लस घेतल्यानंतर नियमानुसार लाभार्थींनी लसीकरण केंद्रामध्ये थांबावे. डॉक्टरांच्या निगराणीत असताना लाभार्थीला काही झाल्यास त्यावर तत्काळ उपचार शक्य आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर बाहेर पडण्याची घाई करू नये.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला