अकोला: लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर दुसरा डोस घेण्यासाठी अक्षरशः हेलपाटे घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात मनपाच्या केंद्रात कोव्हाक्सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांची गर्दी उसळली. परंतु अचानक या ठिकाणचे केंद्र बंद करण्यात येवून नागरिकांना अकोट फाइल परिसरातील मनपाच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात घेता जिल्हा प्रशासन व मनपाच्या नियोजनाचे तीन-तेरा वाजल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठीही लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला आहे. दरम्यान, यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. मंगळवारी कोव्हाक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातील मनपाच्या केंद्रात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी अवघ्या दीडशे लसी उपलब्ध होत्या. परंतु याबाबत माहिती देण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे लस घेण्यासाठी तब्बल सहाशे ते सातशे पेक्षा अधिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. यावर कुठे माशी शिंकली देव जाणे, अचानक सदर केंद्र बंद करण्यात येवून ही लस अकोटफाइल येथील आरोग्य केंद्रात उपलब्ध असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. त्यामुळे रांगेत अनेक तास ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. धावपळ करीत सर्व नागरिकांनी अकोट फाइल येथील आरोग्य केंद्र गाठले.
मनपा प्रशासनाचे हात वर
शहरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने एकात्मिक नागरी आरोग्य केंद्रांकडे सोपवली आहे. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील केंद्र बंद करून अकोटफाइल येथील केंद्रात लस उपलब्ध असल्याची माहिती देणाऱ्या मनपाच्या नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी याविषयी हात वर केल्याचे समोर आले.
भाजपने केली मंडप व पाण्याची व्यवस्था
लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अकोट फाइल येथील केंद्रात भर उन्हामध्ये उभे रहावे लागले. यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हामुळे चक्कर आले. याची माहिती मिळताच भाजपच्यावतीने या ठिकाणी तातडीने मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.