अकोला : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली जात आहे. मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याचे नियोजन आहे, मात्र त्यांच्यासाठी मोहीम कशी राबवावी, ज्येष्ठांची माहिती कशी संकलित करायची, या संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. जिल्हा आरोग्य विभाग मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत असून, त्यानंतरच लसीकरणाचे पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. देशभरात कोविड लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली जात आहे. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याचे नियोजन आहे. या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात होत आहे, परंतु ही मोहीम कशा पद्धतीने राबविली जाईल यासंदर्भात मार्गदर्शक सूचना अद्यापही जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे इतर लाभार्थींसारखी ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार कशी करायची, विनानोंदणीच थेट लसीकरण बुथवर जाऊन लसीकरण होईल का? या संदर्भात आरोग्य विभाग संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. ज्येष्ठांच्या लसीकरण मोहिमेला केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक असून, त्यांची माहिती संकलित करण्यास किमान महिनाभराचा कालावधील लागू शकतो, अशा परिस्थितीत शासनाकडून काय मार्गदर्शक सूचना मिळतात याची प्रतीक्षा आहे.
झोन किंवा वॉर्डनिहाय होऊ शकते लसीकरण
वैद्यकीय सूत्रांच्या मते, जिल्ह्यातील ज्येष्ठांची संख्या पाहता त्यांची माहिती संकलित करणे आणि कोविन ॲपमध्ये समाविष्ट करण्यात मोठा वेळ खर्ची होऊ शकतो. त्यामुळे ही मोहीम पोलिओच्या धर्तीवर वॉर्डनिहाय किंवा झोननिहाय राबविण्यात येऊ शकते. लसीकरणासंदर्भात हा अंदाज वर्तविण्यात येत असला, तरी आरोग्य विभाग शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.
कोविनॲप दोन दिवस राहणार बंद
कोविड लसीकरण मोहिमेत कोविनॲपची महत्त्वाची भूमिका आहे. या ॲपमध्ये गरजेनुसार अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. त्याआनुषंगाने कोविनॲप २७ आणि २८ फेब्रुवारी, असे दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत वरिष्ठ स्तरावरून अजून तरी मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत. शिवाय, दोन दिवसांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करणे शक्य नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच पुढील रूपरेषा ठरणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला