लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लसीअभावी जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम संथगतीने सुरू असून, अनेकांना दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. मात्र, कोव्हॅक्सिनचा गरजेनुसार पुरवठा होत नाही. दुसरीकडे जिल्ह्याला कोविशिल्डचा दर आठवड्याला पुरवठा हाेत आहे. रविवारी कोविशिल्डचे आणखी ११ हजार २०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी उत्साहाची स्थिती असली, तरी लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध लसीचा साठा हा मर्यादीत असल्याने लसीकरणाची गतीही मंदावली आहे. रविवारी विभागासाठी कोविशिल्डचे ६३ हजार डोस प्राप्त झाले असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठीच्या ११ हजार २०० डोसचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अकोला मंडळाला रविवारी लस उपलब्ध होताच पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण करण्यात आले. दरम्यान, लस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेला काही प्रमाणात गती मिळणार असली, तरी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यालाच लस
लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ४५ वर्षांवरील लाभार्थींनाही आता ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली, त्यांनाच लस दिली जाणार आहे. मात्र, असे असले तरी अनेक केंद्रांवर नोंदणी न करणाऱ्यांचीही गर्दी होत असल्याचे चित्र आहे.