अकोला : कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी ७० ते ८० टक्के परिणामकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र जिल्ह्यात कोविशिल्डचाच सर्वाधिक पुरवठा होत आहे. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याने कोविशिल्डलाच प्रसंती दिली जात आहे. कोविडवर नियंत्रणासाठी लसीच्या रूपात सुरक्षेची ढाल मिळाली आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत तीन लाख ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे तीन लाख १५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३५ हजार नागरिकांनीच कोविडचा दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनची नागरिकांकडून आवर्जून मागणी होत आहेे; परंतु या लसीचा डोस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डाेस मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देणेही बंद करण्याची वेळ ओढवली आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने कोव्हॅक्सिन मिळाली नाही तर नागरिक कोविशिल्ड लसीला पसंती दर्शवित आहेत.
कोविशिल्डच का?
जिल्ह्यात लसीकरणात कोविशिल्ड लसीचे डोस देण्याचे आणि घेण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्याला या लसीचा पुरवठा सर्वाधिक हाेत आहे.
कोविशिल्डचे आतापर्यंत डोस मिळाले आहेत.
या लसीचे आतापर्यंत पहिला व दुसरा असे एकूण तीन लाख डाेस देऊन झाले आहेत.
मागील सहा महिन्यांत कोव्हॅक्सिनचे केवळ ५० हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे.
उपलब्ध लस घेण्यावर भर द्यावा
सध्या जी लस उपलब्ध आहे, ती घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे कोणत्याही एका लसीचा आग्रह धरता कामा नये.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला
एकूण लसीकरण
कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन
३,००,४९० - ५०,१०१