अकोला: गत तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील बहुतांश कोविड लसीकरण केंद्र बंद होते. दरम्यान रविवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस मिळाल्याने सोमवारपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर तोबा गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. काही केंद्रावर मर्यादित टोकन देऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसून आले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने बहुतांश नागरिक कोविड लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लाभार्थी संख्याही वाढत आहे, मात्र त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा साठा संपल्याने मागील तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बंद पडले हाेते. याशिवाय, ग्रामीण भागात केवळ ४५ केंद्र सुरू होते. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाल्याने सोमवारपासून महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. केंद्र सुरू होताच सोमवारी सकाळपासूनच लाभार्थींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. गर्दीमध्ये लाभार्थींनी मास्कचा वापर केला असला, तरी अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहून अनेक लाभार्थी लस न घेताच परतल्याचे चित्र शहरातील काही भागात दिसून आले.
कोव्हॅक्सिनचा साठाच नाही
जिल्ह्यात कोविडच्या दोन्ही लसींचा साठा संपल्याने मागील तीन दिवस लसीकरण मोहीम प्रभावित झाली होती. रविवारी कोविशिल्डचा साठा उपलब्ध झाला, मात्र कोव्हॅक्सिन उपलब्ध न झाल्याने सोमवारी केवळ कोविशिल्ड लसीचाच डोस देणे सुरू केले. त्यामुळे ज्या लाभार्थींना कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे, अशांना लस न घेताच परतावे लागले.