अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना लस मिळविण्यासाठी अनेक जण लसीकरण केंद्राबाहेर मध्यरात्रीपासूनच ठिय्या देत होते. मोठ्या परिश्रमानंतर नागरिकांना लस मिळायची, मात्र मागील काही दिवासांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. लस असूनही कोणी घेत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. हीच स्थिती विभागात असून, आतापर्यंत केवळ २० लाख ५६ हजार नागरिकांनीच लस घेतल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. अकोल्यासह राज्यात सर्वत्र १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मेच्या पहिल्या आठवड्यात १८ वर्षांवरील लसीकरणालाही सुरुवात झाली, मात्र लसीअभावी या वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले. असे असले तरी ४५ वर्षांवरील लसीकरण सुरूच होते. लस मिळावी म्हणून अनेकांनी मध्यरात्रीपासूनच लसीकरण केंद्राबाहेर ठिय्या मांडल्याचे दिसले, मात्र कोविडची दुसरी लाट ओसरू लागताच लसीकरणाबाबतही अनेकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर मुबलक लस उपलब्ध असूनही लस घेणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. हीच स्थिती विभागातील पाचही जिल्ह्यांत पहावयास मिळत आहे. विभागात आतापर्यंत केवळ २० लाख ५६ हजार नागरिकांचेच लसीकरण झाले असून, त्यात केवळ ४ लाख ८० हजार ९३५ लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे.
३० ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात
१९ जूनपासून ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या गटातील लोक मागील अनेक दिवसांपासून लसीकरणाच्या प्रतीक्षेत होते. आता लसीकरणाला सुरुवात झाल्याने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे संथ गतीने सुरू असलेले लसीकरण पुन्हा वेगाने होेण्याची शक्यता आहे, मात्र दुसरीकडे ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता कायम असल्याचे चित्र दिसत आहे.